नवी दिल्ली : लोकसभेचे विरोधी पक्षनेते यांनी पुन्हा एकदा मतचोरीचा आरोप केला आहे. हरियाणामध्ये जशी मतचोरी झाली आहे तशीच मतचोरी मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि छत्तीसगढ या ठिकाणीही झाली आहे असा आरोप राहुल गांधींनी केला आहे. मागील आठवड्यात पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींनी आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. त्यानंतर पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी मतचोरीचा आरोप केला आहे.
मी स्पष्टपणे सांगू शकतो की हरियाणाप्रमाणेच महाराष्ट्र, छत्तीसगढ, मध्य प्रदेश या ठिकाणीही मतांची चोरी झाली आहे. आमच्याकडे सगळे पुरावे आहेत. हळूहळू आम्ही ते पुरावे समोर आणू. तसंच निवडणूक आयोगाकडेही आम्ही दाद मागणार आहोत. लोकशाहीवर आणि संविधानावर हल्ला केला जातो आहे. हा हल्ला नरेंद्र मोदी, अमित शाह आणि ज्ञानेश कुमार करत आहेत. त्यामुळे भारतमातेचं अतोनात नुकसान होतं आहे.
हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका मागील वर्षी पार पडल्या. या निवडणुकांमध्ये भाजपाला घवघवीत यश मिळालं. महाराष्ट्रात तर महायुतीला 232 जागा मिळाल्या. या सगळ्यानंतर राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि अजित पवार तसंच एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री झाले. महायुतीला मिळालेल्या या प्रचंड यशावरच राहुल गांधींनी आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. याआधी ऑगस्ट महिन्यांतही राहुल गांधींनी याच प्रकारे आरोप केले होते. आता हरियाणा या ठिकाणी 25 लाख मतांची चोरी झाली असं म्हणत राहुल गांधींनी जोरदार टीका केली होती. तसंच ब्राझीलच्या महिलेने 10 बूथवरुन 22 वेळा मतदान केलं असाही खळबळजनक आरोप त्यांनी केला होता. तर भाजपाने आणि निवडणूक आयोगाने त्यांना उत्तर दिलं होतं. मात्र राहुल गांधींनी पुन्हा एकदा मतचोरीचा आरोप केला आहे. महाराष्ट्र, छत्तीसगढ आणि मध्य प्रदेशात मतचोरी झाल्याचं राहुल गांधी म्हणाले आहेत.
महाराष्ट्रात नगरपंचायत, नगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. तसंच महापालिका निवडणुकाही लवकरच होतील. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी आता महाराष्ट्रातही मतचोरी झाली होती या आरोपाचा पुनरुच्चार केला आहे.